एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience
या वर्षीच्या १२वी बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे.
इयत्ता १२वी म्हणजे खूपच अवघड.१२वी बद्दल खूप भयानक ऐकण्यात आलं होतं.खूप मेहनत करावी लागते.कितीही अभ्यास केला तरी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणं कठीण आहे.१०वीला ९०% असले तरीही १२वीला ६०% ते ७०% या मध्येच गुण मिळणार. १२वी म्हणजे आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि अवघड टप्पा असतो.असं सगळे बोलायचे.आता इतकं सगळं सांगितल्या वर भीती तर वाटणारचं ना....
त्यानंतर १२वी आहे म्हणून घेण्यात येतो तो म्हणजे निश्चय, अर्थात बाहेरच काही खायचं नाही, तब्येत सांभाळायची कारण आजारी पडलं तर अभ्यास कसा होणार.बाहेर गावी जायचं नाही, दंगामस्ती करायची नाही तसं केलं तरं त्याचा अभ्यासावर परिणाम होईल आणि मग चांगले मार्क्स मिळणार नाहीत.हे असं मी ठरवलं होतं मला वाटतं सगळ्यांनीच असा निश्चय केला असावा.
पण....
१२वी २०२०-२१ या वर्षामध्ये अशा काही अडचणी होत्या त्या आधी कधीच नव्हत्या, त्या म्हणजे कोरोना,त्यामुळे असलेलं लॉकडाऊन तसचं शाळा, कॉलेजेस बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण.त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे सिलॅबस बदलला.दरवेळी १२वीचे वर्ष मार्च मध्ये सुरू होतं आणि पुढच्या मार्चपर्यंत संपत.
दोनहजार वीस एकवीस चे बारावी वर्ष खरतर वर्ष म्हणतात येणार नाही. मार्च मध्ये काही ठिकाणी शिक्षण सुरू झालं ते पण ऑनलाईन. हे असं शिक्षण कोणाला आवडलं, तर कोणाला अजिबात आवडलं नाही.काहींना जमलं पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असे शिक्षण समजण्या पलीकडे होतं. त्यात सिलॅबस बदलल्याने नवीन पुस्तके घ्यावी लागणार होती, पण ती सुद्धा उपलब्ध नव्हती मग काय मोबाईल आहेतच...
पीडीएफ डाऊनलोड करून बसा वाचत. मोबाईल हा गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडिया वापरण्यासाठी चांगला वाटतो पण मोबाईल वरून शिक्षण नकोच वाटतं.
दिवस जात होते पण बारावीचं काय चाललं आहे समजत नव्हतं, एकीकडे भीती होती मार्क चांगले मिळाले नाही तर पुढे ॲडमिशन मिळणार नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे सगळंच नको वाटत होतं.
साधारणता जुलैमध्ये सगळ्या कॉलेजमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले काहींचा अभ्यास होत होता,तर खूप विद्यार्थ्यांनी अभ्यास करनचं सोडून दिलं होतं. खऱ्या अर्थाने कॉलेज सुरू झालं ते नोव्हेंबर मध्ये ते सुद्धा खूप शिस्तीने नियमांचे पालन करून.
नंतर पुन्हा एकदा मार्चमध्ये कोरोना वाढला, लोकडाऊन पडलं, शाळा-कॉलेजेस पुन्हा बंद झाली.आता सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे बारावीची परीक्षा कशी आणि कधी होणार . 23 एप्रिल ला परीक्षा होईल असं समजलं. मग टेन्शन वाढले अभ्यास झाला नाही, काही समजलेच नाही असं वाटत होतं. पण खूप विद्यार्थी असे होते की ते परीक्षेची आतुरतेने वाट बघत होते वर्षभर मेहनत केलेल्यांना असं वाटत होतं की कधी एकदा पेपर देतोय. पण यामध्ये परत अडचण आली ती म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी होते. परीक्षा घेतली आणि कोरोना चा प्रादुर्भाव वाढला... तर काय करणार ? त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली यावेळी परीक्षेची तारीख जाहीर केली नाही.
मग कधी होणार परीक्षा याची धाकधूक बारावीच्या विद्यार्थ्यांना होती. परीक्षा घ्यायची की नाही? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी वैतागले होते.काही विद्यार्थ्यांचे मत होते परीक्षा व्हायलाच हवी,
कारण त्यांनी वर्षभर केलेली मेहनत वाया जाईल.बरेच विद्यार्थी वाट बघत होते की कधी एकदा असे कळते की परीक्षा रद्द झाली आहे. ऑनलाईन परीक्षा हा एक उपाय होता पण लाखो विद्यार्थ्यांची एका वेळी परीक्षा घेणे शक्य नव्हते.
शेवटी समजलेच परीक्षा रद्द झाली. विद्यार्थी खूप खुश झाले. बारावी बोर्ड परीक्षा कॅन्सल म्हणजे,किती आनंदाची गोष्ट ना... लोकांनी ज्या परीक्षेची इतकी भीती घातली होती, ती परीक्षा आता होणारच नाही.आनंद गगनात मावेना...अशी स्थिती विद्यार्थ्यांची होती. पण काही विद्यार्थी खूप निराश आणि हताश झाले.त्यांनी वर्षभर परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती हे कष्ट वाया गेले असे त्यांना वाटू लागले. त्यावेळी सगळ्यात जास्त दुःख झाले असेल ते त्या मुलांना ज्यांची परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती, ते आतुर होते परीक्षा देण्यासाठी.
या कोरोना महामारी पुढे कोणाचं काहीच चालत नाही.परीक्षा रद्द करणे हाच एक पर्याय होता. लाखो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे बरोबर नाही म्हणून हा निर्णय घेणे गरजेचं होतं असं मला वाटतं.
परीक्षा रद्द झाल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता.
परिक्षा तर झाली नाही मग रिझल्टच काय..?रिझल्ट मिळाल्याशिवाय पुढे ॲडमिशन कसं होणार...?
पुन्हा एकदा बारावीचे विद्यार्थी टेन्शनमध्ये. एप्रिल संपला, मे संपला कसा तयार होणार रिझल्ट... पुढे काय होणार?
एकदाचं समजलं जूनमध्ये, रिझल्ट कसा तयार होणार ते.दहावीचे तीस टक्के, अकरावीचे तीस टक्के आणि बारावीचे चाळीस टक्के असे मार्क्स मिळून बारावीचा रिझल्ट तयार होणार. या निर्णयावर पण काही खुश,तर काही नाखूष होते. कोरोनामुळे हे करणं भाग होतं.
दहावी आणि अकरावी चे मार्क्स तर माहीत होते.१२वीचे मार्क कसे देणार हे माहीत नव्हतं.नंतर थोड्या दिवसांनी कॉलेजमध्ये पेपर आणि प्रॅक्टिकल बुक सोडवून सबमिट करायचं असं सांगण्यात आलं. तेच मार्क्स बारावीचे पकडण्यात येतील. बारावीच्या सबमिशन साठी सगळ्याचं विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती.जुलैमध्ये सबमिशन झाले.
आता रिजल्ट कधी येणार काय माहित अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली होती.खरंतर मला असं वाटतं एखाद्या मुव्ही मध्ये जितके सस्पेन्स नसतील,तितके सस्पेन्स यावर्षी बारावीत होते.२९ जुलैला रिझल्ट लागेल असे समजले. सोशल मीडियावर तशी चर्चा होती. पण २९ जुलैला रिझल्ट लागलाच नाही. त्या नंतर असं वाटलं की ३०ला लागेल पण नाही लागला ३१ तारीख झाली. एक तारीख सुद्धा झाली. आता तर सगळ्यांची उत्सुकता खूप वाढत होती आणि सगळे विद्यार्थी खूपच वैतागून गेले होते. शेवटी दोन तारखेला असं जाहीर झालं की दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी बारावी बोर्ड रिझल्ट दुपारी चारनंतर ऑनलाइन संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. दोन तारखेला समजलं की उद्या रिझल्ट आहे,त्यामुळे खूपच टेन्शन वाढलं होतं , कारण परीक्षा तर झाली नव्हती मग मार्क्स कसे दिले असतील, किती पडले असतील, चांगले पडतील की नाही खूप सारे प्रश्न पडले होते. जनु प्रश्नांचा पाऊस मनात कोसळत होता.
12 वी चा शेवटचा दिवस तो म्हणजे रिझल्ट चा 4:00 वाजता रिझल्ट आहे हे माहीत झालं होतं ,पण त्या आधी मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याचे हृदयाचे ठोके वाढले असतील. कोणाच्या मनात भिती असेल तर कोणाच्या मनात उत्सुकता असेल रिझल्ट बघण्याची आतुरता बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला होती.
चार वाजले रिझल्ट लागला रिझल्ट बघताक्षणी थक्क झाल्यासारखं झालं. असा रिझल्ट बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. बारावी मध्ये ९० मार्क आश्चर्य आहेच ना... सुरुवातीला असं ऐकण्यात आलं होतं की, ७० सुद्धा पडणार नाहीत, पण इथे तर ९० पडले आहेत. विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त मार्क्स पडले आहेत. असं नाही की हे मार्क्स फुकटचे आहेत, पण तरीही जास्त आहेत हे मान्य आहे. दहावी आणि अकरावी चा पाया भक्कम होता त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले.असेही विद्यार्थी होते ज्यांना दहावी आणि अकरावीला मार्क्स कमी होते, पण त्यांनी बारावीमध्ये खूप मेहनत केली होती आणि निश्चय केला होता की मार्क्स चांगले मिळवायचे पण त्यांना ते शक्य झाले नाही. ते विद्यार्थी तर नाराज आहेतच.
परीक्षा झाली असती तर इतके मार्क्स पडले नसते ज्याने अभ्यास केला होता त्यांना चांगले मार्क्स पडलेच असते.जे हुशार आहेत त्यांना आता पण चांगलेच मार्क्स पडले आहेत. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे, त्या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाणार नाही असं मला वाटतं , कारण अजून सीईटी आहे यामध्ये त्यांना त्यांची वर्षभराची मेहनत उपयोगी पडेल.
असं होतं हे २०२०-२१ बारावीचे वर्ष....
~ श्रुती मोरे
4.8.2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा