सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

दहावी बारावी नंतर काय ?

दहावी बारावी नंतर काय...??
        
             दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झाले, पण... आता टेन्शन आणि कन्फ्युजन संपलं असं नाही. तर ते जास्त वाढलं आहे.
             दहावी-बारावी तर झाली, पण आता पुढे काय? कोणती साईड निवडायची ? नेमकं काय करायचं ? या अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थी गोंधळून गेले आहेत.    
              दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच पैकी एक पर्याय निवडावा लागेल. सायन्स,कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा किंवा आय.टी.आय. काही विद्यार्थ्यांचे ठरले असेल, पुढे आपल्याला काय करायचे आहे.त्यानुसार ते एक पर्याय निवडतील. पण, बरेच विद्यार्थी असे आहेत की, त्यांना समजत नाहीये काय करावं ? यापैकी एक पर्याय निवडला म्हणजे झालं,असे तर होत नाही ना. आपल्याला कशामध्ये आवड आहे हे समजायला हवं. काही विद्यार्थी पालकांच्या सांगण्यावरून किंवा इतरांच्या सांगण्यावरून सायन्स निवडतात, पण ते त्या विद्यार्थ्याला जमत नसेल , तर त्यांचा धीर खचून जाईल. त्याला जे जमत होतं ते सुद्धा परत करता येणार नाही. मला असं म्हणायचं नाही की पालकांच किंवा इतरांचा ऐकू नये. ते चुकीचे असतात असं तर अजिबात नाही . आपल्याला जमेल आपल्याला आवडेल त्या साईडलाच आपण ऍडमिशन घ्याव. म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा आपला निर्णय चुकणार नाही. हे झालं दहावीच्या विद्यार्थ्यांच.
                आता , विषय येतो तो बारावीच्या विद्यार्थ्यांचा. मला खात्री आहे, प्रत्येक विद्यार्थी आता हाच विचार करत असेल की पुढे काय करायचं ? कोणत्या साइडला ॲडमिशन घ्यायचं इंजीनियरिंग का मेडिकल, डिप्लोमा, फार्मसी की आणखी दुसरे काही नेमकं करायचं तरी काय..?
            काही विद्यार्थ्यांचा निश्चय पक्का असेल. मी हेच करणार , यालाच ऍडमिशन घेणार. त्यांनी ऍडमिशन प्रोसेस सुद्धा सुरू केली असेल. पण लाखो विद्यार्थी असे असतील की, त्यांना काय करावं सुचत नसेल. त्यामुळे बरेच विद्यार्थी डिप्रेशन मध्ये सुद्धा गेले असतील. अशावेळी  मोठ्यांचा आधार आणि स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचं असतं.
             बारावी पर्यंत आलो ते पण घरच्यांनी सांगितलं म्हणून या साइडला घेतलं. मग आता पुढे काय करू काय कळत नाहीये.काहींनी तर आपला मित्र किंवा मैत्रीण सायन्सला जातो , म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलं असेल. पण त्यांना आता असं वाटत असेल मला सायन्स नको होतं , मी कॉमर्सला जायला हव होतं किंवा डिप्लोमा करायला हवा होता. पण आता वेळ निघून गेली आहे. विद्यार्थी स्वतःला दोष देत असतील. आता तसे न करता पूढचा मार्ग कसा निवडता येईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.
               बारावी नंतर खूप काही करता येतं खूप कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्यांनी ठरलं असेल त्यांना आता काहीच अडचण नाहीये ते त्यांचे ध्येय गाठण्यासाठी तयार आहेत. खूप विद्यार्थ्यांना कळत नाहीये काय करावं.त्यात आता बारावी झाल्यानंतर मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे.... जिथे जाईल तिथे सगळे हेच विचारतात, मग आता पुढे काय करणार आहेस..? काहीजण ठरलेले नाही बघू आता पुढे असे म्हणतात, ठरवलं असेल ते सांगतात.
पुढे काय करणार असे विचारून झालं की, परत तू हे कर, याला ऍडमिशन घे,हे चांगले आहे, असंच कर असे जवळजवळ सगळेच सांगतात. अर्थात ते अनुभवी असतात म्हणून सांगतात.
            काय होतं आपलं ठरलेलं असतं काय करायचं आहे, पण मध्येच कोणीतरी सांगतं हे चांगलं नाही,स्कोप नाही दुसरं काही तर कर. मग काय पुन्हा टेन्शन येतं... खरंच मी ठरवलेलं आहे ते बरोबर आहे की, नाही असा प्रश्‍न पुन्हा मनाला सतावतो.
                  मला वाटतं मोठ्या लोकांची ॲडव्हाइस घ्यायचीच, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही कोणत्या फिल्ड मध्ये काय आहे वगैरे....
त्यानंतर आपल्याला काय जमतं ,आपली आवड काय आहे, हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं. कन्फ्युजन होईल,पण स्वतःला काय जमतं, काय आवडतं.हे न कळण्याइतकं आपण आता लहान नाहीये. या वयामध्ये स्वतःला समजून घेणं स्वतः सावरनं खूप गरजेचं आहे. हीच तर खरी सुरुवात आहे. काहीतरी करण्याची जिद्द प्रत्येकामध्ये असते. फक्त ती ओळखता येत नाही. ज्याला ते जमेल, तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होईल. स्वतःपेक्षा जास्त स्वतःला कोणीच ओळखू शकत नाही. आपण जो निर्णय घेऊ तो विचार करून काळजीपूर्वक घ्यायला हवा.
               दहावी-बारावीनंतर काय करायचं हे जर स्वतःला समजलं तर नक्कीच आपण आपले ध्येय प्राप्त करू...!

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience

एक अनुभव - बारावी | HSC 2021 experience | HSC result | Board exam cancel 2021 experience


              या वर्षीच्या १२वी बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे.

              इयत्ता १२वी म्हणजे खूपच अवघड.१२वी बद्दल खूप भयानक ऐकण्यात आलं होतं.खूप मेहनत करावी लागते.कितीही अभ्यास केला तरी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणं कठीण आहे.१०वीला ९०% असले तरीही १२वीला ६०% ते ७०% या मध्येच गुण मिळणार. १२वी म्हणजे आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि अवघड टप्पा असतो.असं सगळे बोलायचे.आता इतकं सगळं सांगितल्या वर भीती तर वाटणारचं ना....

त्यानंतर १२वी आहे म्हणून घेण्यात येतो तो म्हणजे निश्चय, अर्थात बाहेरच काही खायचं नाही, तब्येत सांभाळायची कारण आजारी पडलं तर अभ्यास कसा होणार.बाहेर गावी जायचं नाही, दंगामस्ती करायची नाही तसं केलं तरं त्याचा अभ्यासावर परिणाम होईल आणि मग चांगले मार्क्स मिळणार नाहीत.हे असं मी ठरवलं होतं मला वाटतं सगळ्यांनीच असा निश्चय केला असावा.
 पण....
           १२वी २०२०-२१ या वर्षामध्ये अशा काही अडचणी होत्या त्या आधी कधीच नव्हत्या, त्या म्हणजे कोरोना,त्यामुळे असलेलं लॉकडाऊन तसचं शाळा, कॉलेजेस बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण.त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे सिलॅबस बदलला.दरवेळी १२वीचे वर्ष मार्च मध्ये सुरू होतं आणि पुढच्या मार्चपर्यंत संपत.
            दोनहजार वीस एकवीस चे बारावी वर्ष खरतर वर्ष म्हणतात येणार  नाही. मार्च मध्ये काही ठिकाणी शिक्षण सुरू झालं ते पण ऑनलाईन. हे असं शिक्षण कोणाला आवडलं, तर कोणाला अजिबात आवडलं नाही.काहींना जमलं पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असे शिक्षण समजण्या पलीकडे होतं. त्यात सिलॅबस बदलल्याने नवीन पुस्तके घ्यावी लागणार होती, पण ती सुद्धा उपलब्ध नव्हती मग काय मोबाईल आहेतच...

पीडीएफ डाऊनलोड करून बसा वाचत. मोबाईल हा गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडिया वापरण्यासाठी चांगला वाटतो पण मोबाईल वरून शिक्षण नकोच वाटतं.
               दिवस जात होते पण बारावीचं काय चाललं आहे समजत नव्हतं, एकीकडे भीती होती मार्क चांगले मिळाले नाही तर पुढे ॲडमिशन मिळणार नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे सगळंच नको वाटत होतं.              
साधारणता जुलैमध्ये सगळ्या कॉलेजमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले काहींचा अभ्यास होत होता,तर खूप विद्यार्थ्यांनी अभ्यास करनचं सोडून दिलं होतं. खऱ्या अर्थाने कॉलेज सुरू झालं ते नोव्हेंबर मध्ये ते सुद्धा खूप शिस्तीने नियमांचे पालन करून.               
               नंतर पुन्हा एकदा मार्चमध्ये कोरोना वाढला, लोकडाऊन पडलं, शाळा-कॉलेजेस पुन्हा बंद झाली.आता सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे बारावीची परीक्षा कशी आणि कधी होणार . 23 एप्रिल ला परीक्षा होईल असं समजलं. मग टेन्शन वाढले अभ्यास झाला नाही, काही समजलेच नाही असं वाटत होतं. पण खूप विद्यार्थी असे होते की ते परीक्षेची आतुरतेने वाट बघत होते वर्षभर मेहनत केलेल्यांना असं वाटत होतं की कधी एकदा पेपर देतोय. पण यामध्ये परत अडचण आली ती म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी होते. परीक्षा घेतली आणि कोरोना चा प्रादुर्भाव वाढला... तर काय करणार ? त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली यावेळी परीक्षेची तारीख जाहीर केली नाही.
              मग कधी होणार परीक्षा याची धाकधूक बारावीच्या विद्यार्थ्यांना होती. परीक्षा घ्यायची की नाही? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी वैतागले होते.काही विद्यार्थ्यांचे मत होते परीक्षा  व्हायलाच हवी,
कारण त्यांनी वर्षभर केलेली मेहनत वाया जाईल.बरेच विद्यार्थी वाट बघत होते की कधी एकदा असे कळते की परीक्षा रद्द झाली आहे. ऑनलाईन परीक्षा हा एक उपाय होता पण लाखो विद्यार्थ्यांची एका वेळी परीक्षा घेणे शक्य नव्हते.
               शेवटी समजलेच परीक्षा रद्द झाली. विद्यार्थी खूप खुश झाले. बारावी बोर्ड परीक्षा कॅन्सल म्हणजे,किती आनंदाची गोष्ट ना... लोकांनी ज्या परीक्षेची इतकी भीती घातली होती, ती परीक्षा आता होणारच नाही.आनंद गगनात मावेना...अशी स्थिती विद्यार्थ्यांची होती. पण काही विद्यार्थी खूप निराश आणि हताश झाले.त्यांनी वर्षभर परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली  होती हे कष्ट वाया गेले असे त्यांना वाटू लागले. त्यावेळी सगळ्यात जास्त दुःख झाले असेल ते त्या मुलांना ज्यांची परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती, ते आतुर होते परीक्षा देण्यासाठी.

              या कोरोना महामारी पुढे कोणाचं काहीच चालत नाही.परीक्षा रद्द करणे हाच एक पर्याय होता. लाखो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे बरोबर नाही म्हणून हा निर्णय घेणे गरजेचं होतं असं मला वाटतं.
         परीक्षा रद्द झाल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता.
         परिक्षा तर झाली नाही मग रिझल्टच काय..?रिझल्ट मिळाल्याशिवाय पुढे ॲडमिशन कसं होणार...?
पुन्हा एकदा बारावीचे विद्यार्थी टेन्शनमध्ये. एप्रिल संपला, मे संपला‌ कसा तयार होणार‌ रिझल्ट... पुढे काय होणार?
           एकदाचं समजलं जूनमध्ये, रिझल्ट कसा तयार होणार ते.दहावीचे तीस टक्के, अकरावीचे तीस टक्के आणि बारावीचे चाळीस टक्के असे मार्क्स मिळून बारावीचा रिझल्ट तयार होणार. या निर्णयावर पण काही खुश,तर काही नाखूष होते. कोरोनामुळे हे करणं भाग होतं.
        दहावी आणि अकरावी चे मार्क्स तर माहीत होते.१२वीचे मार्क कसे देणार हे माहीत नव्हतं.नंतर थोड्या दिवसांनी कॉलेजमध्ये पेपर आणि प्रॅक्टिकल बुक सोडवून सबमिट करायचं असं सांगण्यात आलं. तेच मार्क्स बारावीचे पकडण्यात येतील. बारावीच्या सबमिशन साठी सगळ्याचं विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती.जुलैमध्ये सबमिशन झाले.
        ‌ आता रिजल्ट कधी येणार काय माहित अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली होती.खरंतर मला असं वाटतं एखाद्या मुव्ही मध्ये जितके सस्पेन्स नसतील,तितके सस्पेन्स यावर्षी बारावीत होते.२९ जुलैला रिझल्ट लागेल असे समजले. सोशल मीडियावर तशी चर्चा होती. पण २९ जुलैला रिझल्ट लागलाच नाही. त्या नंतर असं वाटलं की ३०ला लागेल पण नाही लागला   ३१ तारीख झाली. एक तारीख सुद्धा झाली. आता तर सगळ्यांची उत्सुकता खूप वाढत होती आणि सगळे विद्यार्थी खूपच वैतागून गेले होते. शेवटी दोन तारखेला असं जाहीर झालं की दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी बारावी बोर्ड रिझल्ट दुपारी चारनंतर ऑनलाइन संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. दोन तारखेला समजलं की उद्या रिझल्ट आहे,त्यामुळे खूपच टेन्शन वाढलं होतं , कारण परीक्षा तर झाली नव्हती मग मार्क्स कसे दिले असतील, किती पडले असतील, चांगले पडतील की नाही खूप सारे प्रश्न पडले होते. जनु प्रश्नांचा पाऊस मनात कोसळत होता.
                12 वी चा शेवटचा दिवस तो म्हणजे रिझल्ट चा 4:00 वाजता रिझल्ट आहे हे माहीत झालं होतं ,पण त्या  आधी मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याचे हृदयाचे ठोके वाढले असतील. कोणाच्या मनात भिती असेल तर कोणाच्या मनात उत्सुकता असेल रिझल्ट बघण्याची आतुरता बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला होती.

               चार वाजले रिझल्ट लागला रिझल्ट बघताक्षणी थक्क झाल्यासारखं झालं. असा रिझल्ट बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. बारावी मध्ये ९० मार्क आश्चर्य आहेच ना... सुरुवातीला असं ऐकण्यात आलं होतं की, ७० सुद्धा पडणार नाहीत, पण इथे तर ९० पडले आहेत. विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त मार्क्स पडले आहेत. असं नाही की हे मार्क्स फुकटचे आहेत, पण तरीही जास्त आहेत हे मान्य आहे. दहावी आणि अकरावी चा पाया भक्कम होता त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले.असेही विद्यार्थी होते ज्यांना दहावी आणि अकरावीला मार्क्स कमी होते, पण त्यांनी बारावीमध्ये खूप मेहनत केली होती आणि निश्चय केला होता की मार्क्स चांगले मिळवायचे पण त्यांना ते शक्य झाले नाही. ते विद्यार्थी तर नाराज आहेतच.

         परीक्षा झाली असती तर इतके मार्क्स पडले नसते ज्याने अभ्यास केला होता  त्यांना चांगले मार्क्स पडलेच असते.जे हुशार आहेत त्यांना आता पण चांगलेच मार्क्स पडले आहेत. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे, त्या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाणार नाही असं मला वाटतं , कारण अजून सीईटी आहे यामध्ये त्यांना त्यांची वर्षभराची मेहनत उपयोगी पडेल.

     असं होतं हे २०२०-२१ बारावीचे वर्ष....

~ श्रुती मोरे 
4.8.2021


महापूर - एक भयंकर वास्तव | पाऊस | महापूर 2021 | Kolhapur, sangali flood situation experience

महापूर - एक भयंकर वास्तव | पाऊस | महापूर 2021 | Kolhapur, sangali flood situation experience


          
वर्षातील तीन मुख्य ऋतू पैकी एक म्हणजे पावसाळा...🌧️

          पाऊस म्हणल ना की आता आपल्याला  आनंद, दुःख,भय हे शब्द नक्कीच आठवतील.
पाऊस पडायला हवा असं सगळ्यांनाच वाटत खास करुन आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांना पाण्याची म्हणजेच पावसाची खुप गरज असते, कारण पाण्याशिवाय पिक चांगलं येण शक्यच नाही.खूप कष्ट करून शेतकरी पेरणी करतात त्या नंतर त्यांना फक्त पावसाची ओढ असते.
          पाऊस पडायला लागला की शेतकरी राजा सगळ्यात जास्त खुश होतो, तसेच दुष्काळी भागातील लोकांना पाऊस म्हणजे जणू स्वर्गच असे म्हणायला हरकत नाही.
ज्या लोकांना पाणी मिळत नाही त्यांच्या साठी पाऊस म्हणजे एक प्रकारे देणगीच आहे.
मग पाऊस पडायला लागल्यावर सर्वांना आनंद होणारच ना.
पण.....


        याच पावसाने भयानक रुप धारण केल्यास... 
       काय होईल???
       काय होईल हे आपण गेल्या काही दिवसांत अनुभवलं आहे.कित्येक ठिकाणी पाऊस इतक्या भयानक पद्धतीने कोसळला की माणसांची घरे पाण्याखाली गेली, इमारती ढासळल्या कित्येक माणसं मरण पावली.
शेतं बुडून पिके उध्वस्त झाली, त्याचबरोबर शेतीत हातभार लावणाऱ्या मुक्या जनावरांचा सुध्दा जीव गेला.काही जनावरांना लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं.पण काही जनावरांना वाचवणं शक्य झालं नाही.
कित्येक प्राणी,पक्षी थंडीमुळे तसेच आसरा न मिळाल्याने तडफडून मेले.
       या भयानक पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले , नदीपात्रातील पाणी वाढल्याने आसपासच्या परिसरात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. खूप गावं पाण्याखाली गेली.जणू सगळीकडून दुःखाचा डोंगरच कोसळला.२-३ दिवसांतच या पावसानं सगळं उध्वस्त केलं.पूर आल्याने लाईट गेली, आजच्या काळात लाईट खुप महत्वाची आहे
२ तास लाईट नसली तर चालत नाही पण     काही ठिकाणी २ दिवस लाईट नव्हती.लाइट नसल्यावर जेवण करणे वगैरे सगळेच अवघड होते, बाहेर भयानक पाऊस घरी लाईट नाही अशातच आणखी एक भर म्हणजे अचानक रात्री गॅससिलिंडर संपणे.चूल आणि स्टो नसल्यावर अशा प्रसंगी जेवण बनवायचे तरी कसे....?


            अन्न,वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत...पण आजकालच्या जगात मोबाईल ही सुद्धा एक मुलभूत गरज झाली आहे.लाईट नसल्याने मोबाईल स्विच ऑफ झाले होते, आणि मोबाईल सुरू असलातरी त्यामध्ये रेंज नव्हती.दोन दिवस का होईना पण मोबाईलला लोकांपासून सुटका मिळाली.विनामोबाईल लोकांची अवस्था मात्र वाईट झाली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
हे असं सगळं गेल्या ३-४ दिवसांत झालं.

कोणी पाऊस आला म्हणून आनंदी झाले तर कोणी पाऊस जास्त झाला म्हणून दुःखी झाले आणि याच पावसाने जेव्हा भयानक रुप धारण केले तेव्हा सगळेच थक्क झाले.
     हे एवढं सगळं झालं म्हणजे संकट संपल असं नाही...

     पाऊसामुळे झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई करण्यासाठी खुप दिवस लागतील.


~श्रुती मोरे
२५.७.२०२१ 



दहावी बारावी नंतर काय ?

दहावी बारावी नंतर काय...??                       दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झ...